Home क्राईम चोरट्यांचा डाव फसला! शनीपेठ पोलिसांनी 24 तासांत आरोपीला पकडले

चोरट्यांचा डाव फसला! शनीपेठ पोलिसांनी 24 तासांत आरोपीला पकडले

0
29

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या 3 वेल्डिंग मशीनचे बॉक्स आणि 16 ग्राइंडर मशीनचे बॉक्स, असा एकूण 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे शनीपेठ पोलिसांच्या तपासाची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी जळगाव शहरातील भवानीपेठ येथील नोबल मार्केटिंग अँड मीडिया सोल्युशन यांच्याकडून 3 वेल्डिंग मशीन बॉक्स व 16 ग्राइंडर मशीनचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी 6 ऑगस्ट 2026 रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 162/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला घटनास्थळी पाठवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे तसेच दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या डीबी पथकाने घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. त्यासोबतच उपलब्ध गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढण्यात आला. या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर संशयित वसीम शेख हसन (वय 29, रा. मरिमाता मंदिराजवळ, भिसरूळा, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता त्याने सदर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला 3 वेल्डिंग मशीन बॉक्स आणि 16 ग्राइंडर मशीन बॉक्स असा एकूण 52 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ./1356 विजय खैरे करीत आहेत. चोरीच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासांच्या आत तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयितापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली परिपोलीस अधिकारी संतोष खेडकर, परिपोलीस अधिकारी अभिषेक कटारे, पोहेकॉ योगेश जाधव, पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ अमोल वंजारी, पोहेकॉ पराग दुसाने, पोहेकॉ निलेश धुगे, पोहेकॉ नवजीत चौधरी, पोहेकॉ गणेश ढाकणे आणि पोहेकॉ योगेश साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शनीपेठ पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत छडा लागला असून, 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चोरीच्या घटनेमागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.


Protected Content

Play sound