Home आरोग्य डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या तथा भाजपच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयासह फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये केक कापून, शुभेच्छा देत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि मान्यवरांनी डॉ. केतकी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

शनिवारी सकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि गोदावरी आयएमआर महाविद्यालयात केक कापून डॉ. केतकी पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. केतकी पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. केतकी पाटील सभागृहात आयोजित या विशेष कार्यक्रमाला चेअरमन तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील आणि हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, होमिओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. विद्यानंद आठवले, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार, गोदावरी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश तायडे यांच्यासह पूनमचंद सपकाळे, आयुर्वेद महाविद्यालयाचे रजिस्ट्रार चेतन चौधरी, शिक्षण व संशोधन संचालक अशोक चौधरी, लेखापाल योगेश पाटील, सुनील बोंडे, विकास बेंडाळे, किशोर झांबरे तसेच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी मनोगत व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी एकल गीत सादर केले, तर डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. माया आर्विकर यांनी द्वंद्वगीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संस्कृती भिरूड आणि डॉ. प्राची यांनी केले, तर आभार कु. किवा पाटील यांनी मानले.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनीही विशेष रंगत आणली. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी समूह नृत्य, एकल नृत्य आणि गीत गायन सादर केले. विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्य आणि कलाविष्काराला उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद देत कौतुक केले. कार्यक्रमानंतर गोदावरी फाउंडेशन संचलित विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. केतकी पाटील यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. केतकी पाटील यांनी गोदावरी फाउंडेशनच्या कार्यामागील संस्कार आणि विचारांची परंपरा अधोरेखित केली. “हा पहिला वाढदिवस आहे, ज्याला गोदावरी आजी नाही. गोदावरी हे केवळ एक नाव नसून तो एक संस्कार आणि विचार आहे,” असे त्यांनी सांगितले. गोदावरी हेल्थ सिटी अंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत, केवळ ट्रेंड म्हणून कोणताही निर्णय घेऊ नये, तर सकारात्मक राहून नवा ट्रेंड निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान आत्मसात करण्याची गरज व्यक्त करताना डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थी एका नोबेल अर्थात उदात्त पेशात काम करण्यासाठी तयार होत असल्याचे सांगितले. आपल्या क्षेत्रातील जबाबदारी ओळखून काम करताना गोदावरी आजींचे संस्कार आणि विचार समाजापर्यंत पोहोचवावेत, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

चेअरमन तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनीही डॉ. केतकी पाटील यांना शुभेच्छा देताना गोदावरी फाउंडेशनच्या संस्थांच्या उभारणीमागे गोदावरी आई आणि मोठे भाऊ सुभाषदादा यांचे आशीर्वाद असल्याचे सांगितले. सध्या ‘जेन-झी’ची चर्चा होत असून नेतृत्व हस्तांतरणाची वेळ आली आहे, असे नमूद करत डॉ. केतकी पाटील यांचे भविष्य उज्ज्वल असून त्या भविष्यात मागे वळून पाहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ‘तू मेरी जिंदगी है’ हे गीत सादर करून कार्यक्रमात भावनिक रंग भरला.

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधील आपुलकीचे वातावरणही दिसून आले. शुभेच्छांचा वर्षाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे वाढदिवसाचा सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार, व्यावहारिक ज्ञान आणि सामाजिक बांधिलकी जपत आपल्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करावेत, हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये झालेला उत्सव केवळ वाढदिवस सोहळा न ठरता विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या विचारपरंपरेला जोडणारा प्रसंग ठरला. गोदावरीच्या संस्कारांचा वारसा पुढे नेत सकारात्मक विचार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समाजसेवेची भावना जोपासण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.


Protected Content

Play sound