जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ‘एक पेड़ पापा के नाम’ हा अभिनव वृक्षारोपण उपक्रम जळगावात उत्साहात पार पडला. रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट, जळगाव आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत रोटरी क्लबच्या सदस्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुमारे १५ फूट उंचीची तब्बल ५० झाडे लावली. विशेष म्हणजे केवळ वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी या वृक्षांचे पुढील दोन वर्षे संगोपन, पाणीपुरवठा आणि संरक्षण करण्याची जबाबदारी रोटरॅक्ट गोदावरीच्या सदस्यांनी स्वीकारली. त्यामुळे वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचा आदर्श या उपक्रमातून निर्माण झाला.

वडिलांचे प्रेम, त्याग आणि योगदान यांची आठवण जपत त्यांच्या नावाने झाड लावण्याची संकल्पना या उपक्रमातून प्रत्यक्षात आणण्यात आली. प्रत्येक झाड हे वडिलांच्या आठवणीचे प्रतीक ठरण्यासोबतच भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करेल, असा संदेश यावेळी देण्यात आला. उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाज आणि पर्यावरणाच्या हितासाठी उपयुक्त उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श यानिमित्ताने घालण्यात आला.
या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, रोटरी क्लबचे चेअरमन संजय तापडिया, डॉ. केतकी पाटील, धर्मेंद्र भैय्या, रमेश मुंगड, राजीव बियाणी, डॉ. गोविंद मंत्री, निलेश झंवर, डॉ. मुर्तझा अमरेलीवाला, दिनेश तिवारी आणि नितेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निलीमा वारके, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. निलीमा चौधरी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच रोटरी आणि रोटरॅक्ट क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरॅक्ट अध्यक्षा भूमिका नाले यांनी केले. वडिलांच्या स्मृतींना वृक्षांच्या रूपाने जिवंत ठेवत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. ५० वृक्षांचे पुढील दोन वर्षे संगोपन करण्याचा संकल्प पर्यावरण रक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.



