Home Cities जळगाव ए.टी. झांबरे विद्यालयात प्रधान सचिव रणजीत सिंग देओल यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

ए.टी. झांबरे विद्यालयात प्रधान सचिव रणजीत सिंग देओल यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

0
37

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देओल यांनी के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाला सदिच्छा भेट देत शाळेतील शैक्षणिक वातावरण, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक लॅब आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

या प्रसंगी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन, नाशिक विभागाचे उपसंचालक संजय कुमार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. के.सी.ई. सोसायटीचे संचालक डॉ. ए. आर. राणे आणि मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

विद्यार्थिनी रीया पाटील हिने अपयशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर देओल यांनी अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. “ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि अपयशातून शिकत पुढे जा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

लौकिक ढगे याने क्रीडा क्षेत्रातील करिअरबाबत प्रश्न विचारला असता मेहनत, शिस्त, सातत्य आणि समर्पण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केतन पाटीलने AI मुळे रोजगार कमी होतील का, असे विचारले. यावर तंत्रज्ञानामुळे नव्या रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. वैष्णवी सोनवणे हिने पालकांच्या विरोधाबाबत विचारले असता पालकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्याचा सल्ला देण्यात आला. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, ध्येय निश्चिती आणि भविष्यातील संधींबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले.


Protected Content

Play sound