


नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी नाशिक येथे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणादरम्यान राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांनी नगरसेवकांशी संवाद साधत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक केंद्राच्या वतीने आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाला शुक्रवारी (७ ऑगस्ट) मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन केले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे प्राथमिक कर्तव्य असल्याचे सांगत महाजन म्हणाले की, नगरसेवकांनी आपल्या कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला प्राधान्य दिले पाहिजे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा सहभाग आणि नियोजनबद्ध विकासकामे यांच्या माध्यमातून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने समर्पित भावनेने कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सक्षम लोकप्रतिनिधी आणि प्रभावी स्थानिक स्वराज्य व्यवस्था ही विकसित शहराची खरी ताकद असल्याचेही महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. शहराच्या विविध समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाची तसेच सर्व नगरसेवकांची सविस्तर माहिती दिली. आगामी काळात जळगाव शहराला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित नगरसेवकांना महानगरपालिकेचे कामकाज, जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास महापौर काळे यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षण वर्गात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशिक्षक तथा निवृत्त मनपा आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी नगरसेवकांना महानगरपालिकेची कार्यपद्धती, संबंधित कायदे तसेच सभाशास्त्र याबाबत सखोल मार्गदर्शन केले. महानगरपालिकेच्या सभांमध्ये विषय मांडण्याची पद्धत, नियमांचे पालन, लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या आणि प्रशासनाशी समन्वय यांसह विविध बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रफुल्ल देवकर, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या अर्शीनबानो खाटीक, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष व नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह जळगाव महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



