



यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात एका ११ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर चाकूचा धाक दाखवून अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला गजाआड केले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, यावल शहरातील रहिवासी असलेला संशयित आरोपी इम्रान शेख (वय ३५ वर्षे) याने दिनांक ७ ऑगस्ट रोजी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास हे नीच कृत्य केले. पीडित ११ वर्षांची मुलगी ही तिच्या आजीच्या घरी गेली असताना, शेजारी राहणाऱ्या इम्रान शेख याने मुलीसमोर उभे राहून अश्लील चाळे केले. तसेच तिला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत चाकूचा धाक दाखवून धमकी दिली.
इतकेच नव्हे तर संशयित आरोपी इम्रान शेख हा गेल्या काही दिवसांपासून या चिमुकलीचा तिच्या शाळेत जातेवेळी पाठलाग करून तिच्यावर वाईट नजर ठेवून होता, असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत केला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO – पोक्सो) कायद्यान्वये तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपी इम्रान शेख यास अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत. यावल शहरात चिमुकलीचा पाठलाग करून अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत बेड्या ठोकल्या असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



