Home क्राईम आभोड्यात गोमांस विक्रीवर रावेर पोलिसांची धाड; एकास अटक, दुसरा संशयित फरार

आभोड्यात गोमांस विक्रीवर रावेर पोलिसांची धाड; एकास अटक, दुसरा संशयित फरार

0
13

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आभोडा गावातील बसस्थानक व चावडी परिसरात कथितरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (७ ऑगस्ट) धडक कारवाई केली. या कारवाईत एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून, दुसरा संशयित पोलिसांना पाहताच पसार झाला. कारवाईदरम्यान गोमांस, कत्तलीसाठी वापरलेली हत्यारे तसेच तीन गोवंश पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

रावेर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत आभोडा गावातील बसस्थानक परिसरात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखाली आभोडा येथे पोहोचले. यावेळी एका व्यक्तीच्या राहत्या घरात दोन जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीच्या उद्देशाने मांस कापले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने धाड टाकून उस्मान हसन कुरेशी (वय ४८, रा. आभोडा बु.) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून अंदाजे ३०० किलो वजनाचे, सुमारे ६० हजार रुपये किमतीचे गोमांस तसेच कत्तलीसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड व सुरी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत मांसाचे नमुने घेण्यात आले असून, त्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कारवाईची खातरजमा करत असताना आभोडा गावातील चावडी परिसरातही गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने त्या दिशेने धाव घेतली असता एका घरात कथितरित्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे आढळले. मात्र, पोलिस पथक येत असल्याचे लक्षात येताच इरफान रहेमान ऊर्फ लंगड्या कुरेशी (वय ३२, रा. आभोडा) हा गल्लीबोळाचा फायदा घेत पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या संशयिताच्या घरातूनही अंदाजे ३०० किलो वजनाचे सुमारे ६० हजार रुपये किमतीचे गोमांस, एक कुऱ्हाड व सुरी जप्त करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांसाचे नमुने घेऊन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

फरार संशयिताचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाला आभोडा येथील आठवडे बाजार परिसरात कत्तलीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या बांधून ठेवलेली तीन गोवंश आढळून आली. या गोवंशाची अंदाजे किंमत २७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित गोवंश पुढील देखभालीसाठी गोशाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ०३७६/२०२६ दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ मधील सुधारित अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ५, ५(सी), ६, ९(ए), ११, तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एकास अटक झाली असून, एक संशयित फरार आहे.

फरार संशयिताचा शोध सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. गोवंश कत्तलीसंदर्भातील अशा अवैध प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा रावेर पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, समाधान ठाकूर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, राहुल परदेशी, विकार शेख आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा मशाने यांनी केली.


Protected Content

Play sound