Home क्राईम मुक्ताईनगरात गुटखा तस्करी रोखण्यात अपयश? पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचे सवाल 

मुक्ताईनगरात गुटखा तस्करी रोखण्यात अपयश? पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचे सवाल 

0
15

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहर व परिसरात प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि कथित तस्करी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील विविध भागांत गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचा दावा करत, संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीविरोधात धडक मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणांसह शहरातील विविध भागांत प्रतिबंधित गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून नियमित गस्त व तपासणी केली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात गुटखा विक्रीवर आळा बसलेला दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “नियमित गस्त आणि तपासणी सुरू असताना गुटखा विक्री सुरूच कशी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कर्की सीमा तपासणी नाक्यावर शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. मात्र, प्रतिबंधित गुटख्याची कथित वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही त्याच पद्धतीने कठोर तपासणी व कारवाई का होत नाही, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच पूर्णाड फाटा परिसरात वाहतूक पोलिस आणि इतर पोलिस अधिकारी नियमित तपासणी करत असतानाही कथित गुटखा वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी काही समाजकंटकांकडून कथित गुटखा वाहतूक करणारी वाहने अडवून बेकायदेशीर वसुली केली जात असल्याची चर्चा शहरात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा कथित प्रकारांमुळे काही टोळ्यांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या चर्चांचीही गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

जर प्रतिबंधित गुटख्याच्या कथित वाहतुकीवर समाजकंटकांकडून लक्ष ठेवले जात असेल किंवा बेकायदेशीर वसुलीचे प्रकार होत असतील, तर त्याचा थेट परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांची सत्यता तपासून संबंधित व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्यभर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात विविध ठिकाणी कारवाया सुरू असल्याचे सांगितले जात असताना, मुक्ताईनगरातील कथित गुटखा तस्करीवर अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कारवाईबरोबरच वरिष्ठ स्तरावरूनही या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound