Home उद्योग रावेर आगारात पाच नव्या बसेसचे लोकार्पण ; आमदार नंदकिशोर महाजन यांनी स्वतः...

रावेर आगारात पाच नव्या बसेसचे लोकार्पण ; आमदार नंदकिशोर महाजन यांनी स्वतः चालवली बस

0
20

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर बस आगाराला नव्याने मिळालेल्या पाच बसेसचे लोकार्पण आमदार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. नव्या बसेस सेवेत दाखल झाल्याने रावेर शहरासह ग्रामीण भागातील प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, आगाराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकार्पण सोहळ्यादरम्यान आमदार नंदकिशोर महाजन यांनी नव्या बसचे स्टेअरिंग स्वतः हाती घेत बसस्थानकाच्या आवारात बस चालवून पाहणी केली. आमदारांनी स्वतः बस चालविल्याने उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नव्या बसेसची पाहणी करून प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रावेर बसस्थानकाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. रावेर आगाराला पाच नव्या बसेस उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे. नियमित प्रवास करणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त शहर व ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

नवीन बसेस सेवेत दाखल झाल्याने जुन्या किंवा अपुऱ्या बससेवेमुळे होणाऱ्या अडचणी कमी होऊन प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी अनेक नागरिकांनी नव्या बससेवेचे स्वागत करत रावेर आगारासाठी आणखी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही व्यक्त केली. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, नगराध्यक्षा संगीता महाजन, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण चौधरी, गटनेते अमोल पाटील, सावदा मंडळ प्रभारी विजय महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उमाकांत महाजन, ‘बेटी बचाव-बेटी पढाव’च्या सारिका चव्हाण, सावदा मंडळ तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, रविंद्र पाटील, नगरसेवक राजू ठेकेदार, राजेश शिंदे, पद्माकर महाजन, जिल्हा सदस्य नितीन पाटील, चेतन पाटील, मेहमूद शेख, सुनील पाटील, उमेश महाजन, बाळा आमोदकर, निलेश पाटील, पवन पाटील, बंडू पाटील, संजय महाजन, वासू नरवाडे, शुभम पाटील, चंदू पाटील, नंदिनी पंत, भाग्यश्री इंगळे यांच्यासह महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound