Home Cities भडगाव भाजपचे अनील वाघ यांच्या तक्रारीची दखल ; भडगावच्या दिव्यांग निवासी शाळेत गंभीर...

भाजपचे अनील वाघ यांच्या तक्रारीची दखल ; भडगावच्या दिव्यांग निवासी शाळेत गंभीर अनियमितता उघड

0
24

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव येथील श्री साई समर्थ मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थी बेपत्ता प्रकरणासह शाळेतील विविध अनियमिततांबाबत भाजपचे कार्यकर्ते अनील वाघ यांनी केलेल्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आणि सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांनी संयुक्तपणे केलेल्या चौकशी अहवालात शाळेतील अनेक गंभीर त्रुटी आणि नियमभंग निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक व अधीक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक अनुपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधा, सीसीटीव्ही व्यवस्था, विविध नोंदी आणि प्रशासकीय बाबींमध्येही गंभीर त्रुटी आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या बाबींची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी आदेश देण्याची मागणी आयुक्त, दिव्यांग कल्याण व सक्षमीकरण विभाग, पुणे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अनील वाघ यांनी विद्यार्थ्याच्या बेपत्ता होण्याच्या घटनेबाबत अद्याप गंभीर शंका कायम असल्याचे सांगितले. विद्यार्थी नेमका कसा बेपत्ता झाला, त्याच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला आहे का, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर कारवाई करून प्रकरण संपविणे योग्य ठरणार नसून, शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापनाची निष्पक्ष आणि सर्वंकष चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. अनील वाघ यांनी पुढे मुख्याध्यापक व अधीक्षकांसोबतच संस्थाचालक आणि संचालक यांचीही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. संस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी झाल्यास शासनाची दिशाभूल करून आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का, याबाबतही वस्तुस्थिती समोर येऊ शकते, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ते वरिष्ठ स्तरावर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर निवासी शाळेत दिव्यांग विद्यार्थी वास्तव्यास असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक संवेदनशील मानला जात आहे. विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी आवश्यक यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय नोंदी योग्य पद्धतीने ठेवण्यात येत आहेत की नाही, याची नियमित तपासणी होणे गरजेचे असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. अनील वाघ यांनी सदर शाळेवर तात्काळ प्रशासक नियुक्त करण्याची मागणीही केली आहे. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या मुख्याध्यापक, अधीक्षक, संस्थाचालक आणि संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Protected Content

Play sound