Home Cities अमळनेर पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प. सीईओ करिश्मा नायर यांची अचानक धावती भेट 

पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प. सीईओ करिश्मा नायर यांची अचानक धावती भेट 

0
15

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी अचानक धावती भेट देत आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नव्याने उभारलेल्या इमारतीतील गळती, विविध विभागांमध्ये पडलेले तडे, अस्वच्छता, कर्मचारी व्यवस्थापनातील त्रुटी आणि आयुष्यमान भारत योजनेच्या संथ अंमलबजावणीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या भेटीमुळे आरोग्य केंद्रातील अनेक गंभीर बाबी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागल्याची तसेच आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया कक्ष आणि इतर खोल्यांमध्ये मोठमोठे तडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर करिश्मा नायर यांनी प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण इमारतीची पाहणी केली. त्यांनी प्रत्येक विभागाची तपासणी करून कार्यालयीन कामकाजाचाही सविस्तर आढावा घेतला. भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य सहा-सहा महिने उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा वेग अत्यंत संथ असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी काही कर्मचारी नियमितपणे हजर राहत नसून त्यांच्या जागी खासगी व्यक्तींमार्फत कामे करून घेतली जात असल्याची गंभीर तक्रार केली. औषध निर्माण अधिकारी यांच्या कामासाठीही बाह्य व्यक्तींचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला. अशा परिस्थितीत रुग्णांना चुकीची औषधे मिळाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला. काही कर्मचारी अनुपस्थित राहूनही वेतन घेत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही वैद्यकीय अधिकारी महिला असून त्या नव्याने रुजू झालेल्या आहेत. त्यामुळे काही जुने कर्मचारी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना या सर्व बाबींची माहिती असूनही परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने रुग्ण आणि निवासी कर्मचारी अडचणीत सापडत असल्याचे समोर आले. याशिवाय कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वारंवार शाब्दिक वाद होत असल्याची माहितीही देण्यात आली.

दरम्यान, करिश्मा नायर या प्रत्येक विभागाची पाहणी करत असताना शस्त्रक्रिया विभागाचा कक्ष बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित कक्ष उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र, त्या कक्षाची चावी औषध निर्माण अधिकारी यांच्याकडे असून तेच उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले. तब्बल दहा मिनिटे उलटूनही चावी उपलब्ध न झाल्याने सीईओंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले. पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, कर्मचारी व्यवस्थापन आणि इमारतीच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Protected Content

Play sound