Home क्राईम जळगाव एलसीबीची मोठी कारवाई ; ३० हजारांची चोरीची मोटारसायकल जप्त, रेकॉर्डवरील आरोपी...

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई ; ३० हजारांची चोरीची मोटारसायकल जप्त, रेकॉर्डवरील आरोपी अटकेत

0
12

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) प्रभावी कारवाई करत ३० हजार रुपये किंमतीची चोरीची मोटारसायकल हस्तगत केली असून, वाहन चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

जळगाव शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. अद्याप उघडकीस न आलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करून चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथकाची स्थापना करून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी विशाल जुलाल जाधव (रा. एरंडोल, सध्या रा. विवरे खुर्द, ता. रावेर) याच्याकडे असलेली हिरो डिलक्स कंपनीची लाल-काळ्या रंगाची MH-19-BT-9433 क्रमांकाची मोटारसायकल चोरीची आहे.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे पथक तातडीने विवरे खुर्द येथे रवाना झाले. तेथे संशयित विशाल जाधव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. मोटारसायकलीच्या मालकीबाबत आणि कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्याने ही मोटारसायकल जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर मोटारसायकलीची पडताळणी जळगाव जिल्हा गुन्हे अभिलेखामध्ये करण्यात आली. त्यामध्ये संबंधित मोटारसायकल जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२३ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ नुसार दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ३० हजार रुपये किंमतीची हिरो डिलक्स मोटारसायकल जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून, इतर वाहन चोरीच्या घटनांमध्येही त्याचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ भूषण पाटील आणि पोकॉ राहुल महाजन यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


Protected Content

Play sound