Home राजकीय महिला प्रतिनिधीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाईची भाजपची मागणी

महिला प्रतिनिधीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाईची भाजपची मागणी

0
1

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महिला प्रतिनिधींविषयी आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष, सावदा शहरच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावदा पोलीस ठाण्यात निवेदन देत भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

भाजपने दिलेल्या निवेदनानुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका मोबाईल संभाषणात विजय चौधरी नामक व्यक्तीने रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, अवमानकारक आणि अश्लाघ्य भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याद्वारे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राची संस्कृती महिलांचा सन्मान करणारी आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला प्रतिनिधींविषयी अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे हे केवळ संबंधित व्यक्तीच्या प्रतिष्ठेलाच धक्का पोहोचवणारे नसून संपूर्ण समाजात चुकीचा संदेश देणारे आहे. महिलांच्या सन्मानाला बाधा आणणाऱ्या अशा कृत्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ तसेच लागू असलेल्या इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक, सावदा पोलीस ठाणे यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील, भाजप गटनेत्या रंजना जितेंद्र भारेबे, नगरसेवक पंकज राजाराम येवले, सचिन चुडामण बन्होटे, नकुल नितीन बेंडाळे, नगरसेविका जयश्री अतुल नेहेते, सुनिता संजय तायडे, माजी नगराध्यक्षा देवयानी नितीन बेंडाळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, गजानन बाबुराव भार्गव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound