जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने शहराला अधिक हिरवेगार, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘मिशन ग्रीन जळगाव सिटी’ या विशेष मोहिमेअंतर्गत शहरात तब्बल १ लाख वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, सोमवारी दि. १० रोजी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील, खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत या भव्य मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
जळगाव शहराला हिरवाईची शाल पांघरून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभी करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. वाढते तापमान, वायू प्रदूषण आणि नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रशासनासोबतच नागरिकांचाही सक्रिय सहभाग यात अपेक्षित आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ तसेच महामार्गांच्या दुतर्फा आणि डिव्हायडरवर मोठ्या प्रमाणावर सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व मोकळ्या जागा, सार्वजनिक भूखंड आणि उपलब्ध खुल्या जागांवरही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून शहरातील हिरवळ वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

या उपक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे जळगावातील हेमू कलानी उद्यानात उभारण्यात येणारे ‘मियावाकी जंगल’. जपानी मियावाकी पद्धतीचा अवलंब करून अल्पावधीत घनदाट जंगल निर्माण करण्याचा मानस असून, या ठिकाणी सुमारे १५ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच जैवविविधतेलाही चालना देणारा हा प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने या मोहिमेत केवळ वृक्षारोपणावर भर न देता झाडांचे संगोपन आणि संवर्धन यालाही तितकेच महत्त्व दिले आहे. झाडांना नियमित पाणीपुरवठा, ट्री-गार्डची व्यवस्था, देखभाल आणि संरक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे. प्रत्येक लावलेले झाड जगले पाहिजे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जीवने यांनी नागरिकांना आपल्या परिसरातील झाडांचे पालकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, पर्यावरणप्रेमी, विविध मंडळे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम लोकचळवळीचे स्वरूप धारण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “जळगावचे वाढते तापमान आणि प्रदूषण लक्षात घेता शहराला ग्रीन कॉरिडॉर बनविणे ही काळाची गरज आहे. या एक लाख वृक्षारोपण मोहिमेत प्रत्येक जळगावकराने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा. आपण सर्वांनी मिळून ‘मिशन ग्रीन जळगाव’ यशस्वी करून आपल्या शहराला अधिक सुंदर, हिरवेगार आणि समृद्ध बनवूया.”
शहराच्या पर्यावरणीय विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणारी ही मोहीम जळगावसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून भविष्यात अधिक हरित, स्वच्छ आणि आरोग्यदायी शहर घडविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.



