Home पर्यावरण कुऱ्हा परिसरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार ; तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या, आमदार...

कुऱ्हा परिसरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार ; तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या, आमदार एकनाथराव खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
13

मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात २९ व ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे शेती पिके, नदीकाठची जमीन आणि नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून बाधित भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने आर्थिक मदत आणि भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आमदार खडसे यांनी नमूद केले आहे की, मुसळधार पावसामुळे कुऱ्हा परिसरातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला. पुराचे पाणी थेट शेतांमध्ये आणि वस्त्यांमध्ये शिरल्याने ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठची सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर वाहून गेली असून अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचले आहे. त्यामुळे उभी पिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या गंभीर परिस्थितीनंतरही संबंधित प्रशासनाकडून अद्याप नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले नसल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. पंचनामे आणि नुकसानीचे अधिकृत मूल्यांकन लांबल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू शकते, त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून अहवाल तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आमदार खडसे यांनी निवेदनात खामखेडा पुलाच्या बांधकामाकडेही लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या कामादरम्यान नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पोलभोवतीची माती वेळेवर हटविण्यात न आल्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. परिणामी पुराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन लगतच्या शेतांमध्ये घुसले आणि मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फटका बसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निवेदनात कुऱ्हा परिसरासह खामखेडा पुलालगतच्या सर्व बाधित शेती क्षेत्रांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाच्या नियमांनुसार त्वरित भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पूल बांधकामाच्या कामाची तांत्रिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचीही सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound