Home Cities जळगाव NH-53 महामार्ग निकृष्ट कामामुळे खचला ; दुरुस्ती होईपर्यंत टोल वसुली बंद करण्याची...

NH-53 महामार्ग निकृष्ट कामामुळे खचला ; दुरुस्ती होईपर्यंत टोल वसुली बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
14

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (NH-53) वरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक ठिकाणी महामार्ग खचल्याचा आणि भेगा पडल्याचा आरोप करत, महामार्गाची संपूर्ण दुरुस्ती होईपर्यंत दोन्ही टोल नाक्यांवरील टोल वसुली तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, जळगाव शहरालगतच्या NH-53 महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने आणि भेगा पडल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून प्रवासाचा कालावधीही वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांना जबाबदार धरत त्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महामार्गाची स्थिती समाधानकारक नसताना वाहनचालकांकडून टोल वसूल करणे अन्यायकारक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी ब्रिगेडने महामार्गाची संपूर्ण आणि दर्जेदार दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत दोन्ही टोल नाक्यांवरील टोल वसुली स्थगित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबवून सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound