Home Cities जळगाव पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील निकृष्ट कामांवर शिवसेनेचा गंभीर आरोप

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील निकृष्ट कामांवर शिवसेनेचा गंभीर आरोप

0
14

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील फूपनी येथे सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली संरक्षण भिंत आणि धक्का अल्पावधीतच कोसळल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या घटनेमुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि तालुकाप्रमुख प्रमोद घुगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, फूपनी येथे नुकतेच सुमारे ₹1 कोटी 50 लाख खर्चून उभारण्यात आलेला धक्का आणि संरक्षण भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली असून या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे फूपनी ते देवगाव, गाढोदा, आमोदा बुद्रुक, जामोद आणि पळसोद या गावांमधील दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. रस्ता आणि संरक्षण भिंत खचल्याने नागरिकांची ये-जा धोकादायक बनली असून शालेय विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तसेच महिला वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित कामाला पूर्णत्वाचा दाखला (एनओसी) कोणत्या अधिकारी आणि अभियंत्यांनी दिला, याचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये निष्काळजीपणा अथवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

यासोबतच कोसळलेला धक्का आणि संरक्षण भिंत तातडीने नव्याने व दर्जेदार पद्धतीने उभारावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी योगराज बापू सपकाळे, गुलाब पाटील, संजय पाटील, राहुल सपकाळे, सुपदू ठाकरे, दीपक सपकाळे यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनीही विकासकामांच्या गुणवत्तेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.


Protected Content

Play sound