Home पर्यावरण जोगलखेडे परिसरात अतिवृष्टीचा कहर ; तातडीने पंचनाम्यांची शेतकऱ्यांची मागणी

जोगलखेडे परिसरात अतिवृष्टीचा कहर ; तातडीने पंचनाम्यांची शेतकऱ्यांची मागणी

0
7

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील जोगलखेडे, मेहू, हनुमंतखेडे, देवगाव आणि मुंदाने परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे नदीकाठावरील अनेक शेतजमिनी खरडून गेल्या असून ठिबक सिंचन व्यवस्था, शेतीची अवजारे, बैलगाड्या आणि अन्य साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या प्रचंड वेगामुळे नदीकाठावरील सुपीक शेती मोठ्या प्रमाणावर खरडून गेली आहे. अनेक शेतांमध्ये गाळ साचला असून पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ठिबक सिंचनाच्या लाईन्स, मोटारी, शेतीची विविध अवजारे तसेच बैलगाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दशकांनंतर प्रथमच एवढ्या तीव्र स्वरूपाचा पाऊस आणि नदी-नाल्यांचा रौद्र अवतार पाहायला मिळाला. पुराच्या वेगामुळे नदीपात्रातील मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली. ही झाडे कोल्हापुरी प्रकारच्या के.टी. वेअर आणि लहान बंधाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला आणि शेजारील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून शेतीचे नुकसान अधिक वाढले.

प्राथमिक पाहणीत अनेक शेतजमिनी खरडून गेल्याचे, उभी पिके नष्ट झाल्याचे, ठिबक सिंचन व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे आणि शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य पुरात वाहून गेल्याचे समोर आले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पुढील हंगामासाठी शेती पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या भीषण परिस्थितीमुळे जोगलखेडे, मेहू, हनुमंतखेडे, देवगाव, मुंदाने आणि परिसरातील शेतकरी प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने संयुक्त पाहणी करून नुकसानाचे अचूक मूल्यांकन करावे, अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound