यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी किनगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भगवान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली असून प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून यावल तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करण्यासोबतच पक्षाची विचारधारा आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशांत पाटील यांनी सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळत उल्लेखनीय काम केले आहे. यापूर्वी त्यांनी युवक काँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष म्हणून संघटनात्मक काम पाहिले आहे. तसेच पंचायत समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले असून स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. सहकार क्षेत्रातही प्रशांत पाटील यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना, फैजपूरचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, यावलचे संचालक तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, किनगाव बुद्रुकचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. या माध्यमातून शेतकरी, सहकार क्षेत्र आणि स्थानिक नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे.

किनगाव बुद्रुकच्या माजी सरपंच भारती प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून स्थानिक विकासकामांमध्येही त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. गावातील विविध सामाजिक आणि विकासाभिमुख उपक्रमांमध्ये सहभाग घेत त्यांनी स्थानिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी मिळाल्यानंतर आगामी काळात तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे आव्हान प्रशांत पाटील यांच्यासमोर असणार आहे. युवक, शेतकरी, कामगार, महिला तसेच विविध सामाजिक घटकांशी संपर्क वाढवून काँग्रेसची भूमिका आणि विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने त्यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.
प्रशांत पाटील यांच्या नियुक्तीबद्दल जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) चे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम होऊन पक्षाच्या जनाधाराला बळकटी मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.



