रायपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर येथे गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘आई हीच पहिली गुरु’ या संकल्पनेला उजाळा देणारा मातृपूजन हा संस्कारमय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मातेला प्रथम गुरु मानत तिच्या चरणांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा आणि मातृवंदनेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या चरणांना हळद, कुंकू, फुले अर्पण करून गुरु मंत्राच्या धुनेत मातृपूजन केले. या भावनिक आणि प्रेरणादायी क्षणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. आईप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांनी कृतीतून व्यक्त केली. यावेळी सौ. भारती परदेशी यांनी विद्यार्थ्यांना आई ही जीवनातील पहिली गुरु कशी असते, याचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत सांगितले. जन्मापासून प्रत्येक पावलावर मुलाला योग्य दिशा देणारी, संस्कारांची शिकवण देणारी आणि जगण्याचे धडे देणारी व्यक्ती म्हणजे आई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आईच्या निःस्वार्थ प्रेम, त्याग, माया आणि संकटात खंबीर आधार देणाऱ्या भूमिकेचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी “अक्षरांची ओळख होण्यापूर्वी मायेची भाषा शिकवणारी आणि पुस्तकी ज्ञान मिळण्यापूर्वी जगण्याचे संस्कार देणारी पहिली गुरु म्हणजे आई” हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना आई-वडिलांचा सन्मान करण्याबरोबरच गुरुजनांविषयी आदराची भावना कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या दुसऱ्या गुरु असलेल्या शिक्षकांनाही वंदन केले. गजेंद्र परदेशी सर, सोनाली मॅडम आणि मयुरी वाघ मॅडम यांच्या चरणांना स्पर्श करून विद्यार्थ्यांनी आशीर्वाद घेतला. गुरु-शिष्य नात्यातील पावित्र्य आणि आदरभाव या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हसत-खेळत शिक्षणाचा आनंद घेत असताना चिमुकल्यांनी पारंपरिक ऋषी-मुनी आणि गुरुंचा सजीव देखावा सादर करून भारतीय संस्कृतीची सुंदर झलक उपस्थितांसमोर उभी केली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित पालकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कु. शिवानी पाटील मॅडम आणि कु. चंचल वानखेडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.



