Home आरोग्य गुरुपौर्णिमेनिमित्त जहागिरदार प्रतिष्ठानकडून डॉ. गिरीश सहस्रबुद्धे व डॉ. नंदन माहेश्वरी यांचा गौरव 

गुरुपौर्णिमेनिमित्त जहागिरदार प्रतिष्ठानकडून डॉ. गिरीश सहस्रबुद्धे व डॉ. नंदन माहेश्वरी यांचा गौरव 

0
32

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त कै. भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गिरीश सहस्रबुद्धे आणि डॉ. नंदन माहेश्वरी यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. गेल्या ३२ वर्षांपासून विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या प्रतिष्ठानने यंदाही वैद्यकीय सेवेतील दोन मान्यवरांचा सन्मान करून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

जळगावातील गणपती नगर येथील रोटरी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ह.भ.प. दादा महाराज जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी वैद्य जयंत जहागिरदार होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन, पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी दादा महाराज जोशी यांचे गुरु म्हणून पूजन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ह.भ.प. दादा महाराज जोशी यांनी जहागिरदार प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करताना, गेल्या चार पिढ्यांपासून आणि सलग ३२ वर्षांपासून योग्य व्यक्तींची निवड करून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा समाजासाठी आदर्श असल्याचे सांगितले. “प्रथम विद्या आत्मसात केली की कीर्ती प्राप्त होते आणि त्या यशातून मिळालेली लक्ष्मी चिरकाल टिकते,” असे प्रतिपादन त्यांनी केले. सत्कारमूर्ती डॉ. नंदन माहेश्वरी यांनी हा सन्मान आपल्या आई-वडिलांना, कुटुंबीयांना आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या हजारो रुग्णांना समर्पित करत कृतज्ञता व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाचे सातत्याने शिक्षण घेत ज्ञान, कौशल्य आणि करुणा यांच्या संगमातून युवा डॉक्टरांनी समाजसेवा करावी, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. डॉ. गिरीश सहस्रबुद्धे यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या प्रथम गुरु असलेल्या आईच्या साक्षीने झालेला हा सन्मान आयुष्यातील अत्यंत मोलाचा क्षण असल्याचे सांगितले. विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या श्रेणीत एका फॅमिली फिजिशियनचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी जहागिरदार प्रतिष्ठानप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला आणि डॉ. उदयसिंग पाटील यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात वैद्य जयंत जहागिरदार यांनी समाजहितासाठी समर्पित व्यक्तींचा सन्मान करण्याची प्रतिष्ठानची परंपरा भविष्यातही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. अंजली माहेश्वरी, समृद्धी सहस्रबुद्धे तसेच सत्कारमूर्तींच्या परिवारातील सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ. हर्षवर्धन जोशी आणि मधुरा जहागिरदार यांनी करून दिला. सूत्रसंचालन वैद्य आनंद दशपुत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैद्य आदित्य जहागिरदार यांनी मानले.


Protected Content

Play sound