Home Cities मुक्ताईनगर सारोळे ग्रामपंचायतीत ‘फिक्स’ भरतीचा आरोप; जाहिरात न काढताच नियुक्तीचा डाव, ग्रामस्थांचा संताप

सारोळे ग्रामपंचायतीत ‘फिक्स’ भरतीचा आरोप; जाहिरात न काढताच नियुक्तीचा डाव, ग्रामस्थांचा संताप

0
4

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सारोळे ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या रिक्त पदाच्या भरती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. रिक्त पदासाठी कोणतीही सार्वजनिक जाहिरात प्रसिद्ध न करता नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार पारदर्शकपणे राबविण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले आहे. मात्र, या पदासाठी अद्याप कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नसतानाही एका विशिष्ट व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांना समान संधी मिळणार नाही, अशी भीती व्यक्त करत भरती प्रक्रिया तातडीने स्थगित करून नियमानुसार जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. तक्रार अर्ज सादर करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेलेल्या ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसेवकाने अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावा केला आहे. “अर्ज पोस्टाने पाठवा,” असे सांगून प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रचलित नियमांचा उल्लेख करत रिक्त पदासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करणे, अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा कालावधी देणे, सर्व पात्र उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देणे तसेच संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबविणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. भरती प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने किंवा जाहिरात न देता राबविण्यात आल्यास संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात प्रशासकीय तसेच न्यायालयीन कारवाईचा पर्याय अवलंबला जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांकडेही पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करते का आणि भरती प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार पारदर्शकपणे राबविली जाते का, याकडे सारोळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणातील जाहिरात न देता भरती करण्याचा प्रयत्न, एका विशिष्ट व्यक्तीच्या नियुक्तीबाबतचे आरोप तसेच ग्रामसेवकाने अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याचे दावे हे संबंधित ग्रामस्थांनी केलेले आरोप आहेत. या आरोपांची सत्यता संबंधित सक्षम प्रशासकीय यंत्रणेकडून चौकशी झाल्यानंतरच स्पष्ट होईल.


Protected Content

Play sound