Home क्राईम पाचोरा पोलिसांची मोठी कामगिरी! अट्टल मोटारसायकल चोरटा जेरबंद ; ४ दुचाकींसह १.२०...

पाचोरा पोलिसांची मोठी कामगिरी! अट्टल मोटारसायकल चोरटा जेरबंद ; ४ दुचाकींसह १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
8

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह पाचोरा शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पाचोरा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक करत त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये इतकी असून, या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्हा तसेच पाचोरा शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू ठेवला होता. दरम्यान, २७ जुलै २०२६ रोजी पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरी करणारा आरोपी नंदीचे खेडगाव येथील जळगाव रोडलगत एका शेतातील शेडमध्ये लपून राहत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अमोल राजेंद्र ढमाळे (वय २७, रा. नंदीचे खेडगाव, ता. पाचोरा, ह.मु. काळे नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या ताब्यातून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपी विशेषतः बजाज प्लॅटिना कंपनीच्या दुचाकी मास्टर की (Master Key) च्या सहाय्याने चोरी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारसायकलींशी संबंधित गुन्हे भडगाव पोलीस ठाणे, पाचोरा पोलीस ठाणे तसेच एमआयडीसी वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये भडगाव पोलीस ठाण्याचा गुन्हा क्रमांक २३८/२०२६, पाचोरा पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक ३४९/२०२६ व ३५०/२०२६, तसेच एमआयडीसी वाळुंज पोलीस ठाण्याचा गुन्हा क्रमांक ७१३/२०२६ यांचा समावेश आहे.

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या चारही बजाज प्लॅटिना मोटारसायकलींची अंदाजे किंमत प्रत्येकी ३० हजार रुपये असून, एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अनेक वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोहेकॉ विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, उमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, संदीप पाटील आणि हरीश परदेशी यांनी सक्रिय सहभाग घेतला.


Protected Content

Play sound