वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शहराच्या विकासाशी संबंधित तीन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. नगरपरिषदेच्या वतीने जनहिताचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती देण्यात आली.
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगरपरिषदेच्या वतीने फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिर तसेच तिरंगा सर्कल ते महात्मा फुले सर्कलपर्यंत समांतर रस्ता, दुभाजक आणि आधुनिक प्रकाशयोजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी केली. राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेर गेल्यानंतर जुन्या महामार्गालगतच्या व्यापारी आणि नागरिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, या मार्गाचा विकास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

याशिवाय नवीन बायपासवरील महात्मा फुले सर्कल विकसित करण्यात यावे, तसेच फुलगाव उड्डाणपुलाखालील मोकळी जागा वरणगाव नगरपरिषदेला व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. या माध्यमातून स्थानिक व्यापाऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मांडलेल्या तिन्ही मागण्या जनहिताच्या आणि शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. या सर्व प्रस्तावांची नियमांनुसार पूर्तता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वरणगावच्या जनतेने लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत दाखविलेल्या जागरूकतेचे विशेष कौतुक केले. जनतेने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता विकासाला प्राधान्य देत नगराध्यक्षांची निवड केली, हा लोकशाहीसाठी प्रेरणादायी प्रसंग असल्याचे सांगत त्यांनी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच वरणगावकरांचे अभिनंदन करून शहराच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या भेटीदरम्यान नगरसेवक नाना चौधरी, जनसेवक आकाश निमकर, जनसेवक अजमल खान, फजल शेख, मयूर गावंडे, प्रकाश गव्हाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी सांगितले.



