मुक्ताईनगर/जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत मोहाडी येथे सुरू करण्यात आलेल्या हिमोफिलिया डे-केअर सेंटरमध्ये जीवनावश्यक फॅक्टर-८ इंजेक्शनचा वारंवार होणारा तुटवडा गंभीर चिंता निर्माण करणारा ठरत आहे. दोन ते अडीच वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने सुरू झालेल्या या केंद्रात आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा होत नसल्याने हिमोफिलिया रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणारी ही परिस्थिती तातडीने सुधारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
हिमोफिलिया हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेशी संबंधित दुर्मिळ आणि गंभीर आनुवंशिक आजार आहे. या आजाराने ग्रस्त रुग्णाला अगदी किरकोळ दुखापत झाली तरी रक्तस्राव सहज थांबत नाही. अशा वेळी फॅक्टर-८ इंजेक्शन वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र हे इंजेक्शन उपलब्ध नसल्यास अंतर्गत रक्तस्राव, सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान, अपंगत्व आणि गंभीर परिस्थितीत जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश हिमोफिलिया रुग्ण हे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये फॅक्टर-८ इंजेक्शनची किंमत अत्यंत जास्त असल्यामुळे अनेक कुटुंबांना ते विकत घेणे शक्य होत नाही. परिणामी या रुग्णांचे उपचार पूर्णपणे शासकीय आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून आहेत. मात्र मोहाडी डे-केअर सेंटरमध्ये वारंवार “नो स्टॉक”ची परिस्थिती निर्माण होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी हेलपाटे मारावे लागत असून त्यांचे हाल होत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांच्या सांध्यांमध्ये वारंवार रक्तस्राव होऊन त्यांची हालचाल मर्यादित होत असल्याचे सांगितले जात आहे. लहान मुलांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत असून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी गमवाव्या लागत आहेत. त्यामुळे या आजाराचा फटका केवळ रुग्णांनाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या बसत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

रुग्णांच्या पालकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “केवळ डे-केअर सेंटर सुरू करून जबाबदारी संपत नाही. जीवनावश्यक औषधांचा अखंड साठा उपलब्ध ठेवणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. वेळेवर उपचार मिळणे हा आमचा मूलभूत हक्क आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली. औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे आयुष्य धोक्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करून मोहाडी डे-केअर सेंटरमध्ये फॅक्टर-८ इंजेक्शनचा नियमित आणि पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी हिमोफिलिया रुग्ण, पालक संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



