सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक भुसावळ येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत समाज संघटन मजबूत करणे, युवक-युवतींसाठी विविध उपक्रम राबविणे, सामाजिक सलोखा वाढविणे यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याबद्दल गोविंद शेठ अग्रवाल यांचा अग्रवाल समाजाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
भुसावळ येथील तापी स्टीलचे संचालक महेंद्र अग्रवाल यांच्या कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश अग्रवाल होते. यावेळी चेअरमन पवन मित्तल, गोपाल अग्रवाल (बोदवड), संजय अग्रवाल (भुसावळ), शेंदुर्णी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, महामंत्री रोहित अग्रवाल यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बैठकीत जळगाव जिल्ह्यात तालुकास्तरावर अग्रवाल समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवक व महिलांच्या स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच समाजातील मुला-मुलींच्या विवाहासाठी जिल्ह्यातील अग्रवाल समाज बांधवांना प्राधान्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली. अग्रसेन जयंतीनिमित्त तीन गटांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले.

समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यातील वकील, डॉक्टर, इंजिनिअर आणि सीए यांची स्वतंत्र यादी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी दिवाळीच्या काळात जळगाव येथे परिचय संमेलन आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावेळी शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या गोविंद अग्रवाल यांचा भुसावळ अग्रवाल समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल समाजबांधवांनी अभिनंदन करत सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तापी स्टीलचे संचालक महेंद्र अग्रवाल यांना अंबुजा सिमेंटतर्फे नाशिक स्तरावर उत्कृष्ट उद्योजक सन्मान मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील अग्रवाल समाज बांधवांच्या वतीने महाराजा अग्रसेन यांची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. बैठकीला संतोष अग्रवाल (चोपडा), सिताराम अग्रवाल (पाचोरा), कैलास अग्रवाल (कासोदा), राजेश अग्रवाल (शेंदुर्णी), नंदकिशोर अग्रवाल (फैजपूर), सुभाषचंद्र अग्रवाल (बेलसवाडी), राजेश अग्रवाल (भुसावळ), नरेंद्र अग्रवाल, सतीश अग्रवाल, श्याम सामरिया, नवल मित्तल, निकेश अग्रवाल, आशिष अग्रवाल, संजय सिंघल यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुला-मुलींच्या विवाहासंदर्भात पालकांची संमती घेण्याबाबत शासनाने कायदा करावा, यासाठी अग्रवाल समाजाच्या वतीने जिल्हाभरातून प्रशासनाला निवेदन देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच एसआयआर नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्व अग्रवाल समाज बांधवांनी प्राधान्याने एसआयआर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन शेंदुर्णीचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी केले. बैठकीचे सूत्रसंचालन राजेश अग्रवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवी अग्रवाल यांनी मानले. समाज संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.



