यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथे एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे दहिगाव परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील पाटील वाड्यात राहणारे विनोद हिरामण पाटील (वय ३८) यांनी शुक्रवार, २४ जुलै रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील विजेच्या खांबाला बागायतदार रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ प्रमोद हिरामण पाटील यांनी तातडीने विनोद पाटील यांना उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी प्रमोद हिरामण पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजेंद्र पवार व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरू आहे. मृत विनोद हिरामण पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.



