Home प्रशासन जंतर-मंतर कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात भव्य मोर्चा

जंतर-मंतर कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात भव्य मोर्चा

0
15

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मुक्ताईनगरात विविध सामाजिक, विद्यार्थी आणि राजकीय संघटनांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देत सात दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

गुरुवार, दि. 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रवर्तन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. प्रवर्तन चौक, भुसावळ रोड आणि संताजी नगर मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. या मोर्चात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच प्रवर्तन चौकात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करून आंदोलनाला जनसमर्थन मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोर्चानंतर मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात 20 जुलै रोजी दिल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थी नेते अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नीट पेपरफुटीविरोधातील शांततापूर्ण आंदोलनावर पोलीस, आर.ए.एफ.चे जवान आणि काही असामाजिक घटकांकडून कथित लाठीचार्ज करण्यात आल्याचा निषेध नोंदविण्यात आला.

निवेदनामध्ये या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून द्यावेत, आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करावे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची शासनाने हमी द्यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान करण्यात आलेल्या कथित वक्तव्याबाबतही निषेध व्यक्त करत संबंधितांनी युवकांची माफी मागून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सात दिवसांच्या आत मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आणि व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

मोर्चा आणि सभेला मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते ॲड. अरविंद गोसावी, मुस्लिम मन्यार बिरादरीचे हकीम चौधरी, विद्यार्थिनी सिद्धी राणे, ॲड. चेतन झनके, ॲड. कुणाल गवई, ॲड. पवन पाटील, ॲड. राहुल पाटील, प्रमोद सौंदळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सर्वांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन वक्त्यांनी केले. या आंदोलनात काँग्रेस, उबाठा शिवसेना, ऑल इंडिया पँथर सेना, आंतरराष्ट्रीय प्रारंभिक मानव अधिकार संघटना, भारत मुक्ती मोर्चा, मुस्लिम मन्यार बिरादरी आदी विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण, पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई या मागण्या यावेळी ठळकपणे मांडण्यात आल्या.


Protected Content

Play sound