नवी दिल्ली-वृत्तसेवा ।- लडाखच्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जंतर-मंतर येथे सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर 23 दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारकडून सकारात्मक संवादाची प्रक्रिया सुरू झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. लडाखसंदर्भातील विविध मागण्या आणि त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडले होते. त्यांच्या उपोषणाला देशभरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांचा पाठिंबा मिळत होता.

या आंदोलनात वांगचुक यांच्यासोबत इतर आंदोलक तसेच अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (AISA) चे तीन सदस्यही उपोषणात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतला आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिष्टमंडळ आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेनंतर मागण्यांवर पुढील स्तरावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, लडाखच्या प्रश्नांबाबत सरकारकडून ठोस निर्णय होईपर्यंत जनआंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे देशभराचे लक्ष लागले होते. विविध सामाजिक, विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. अखेर केंद्र सरकारशी संवाद सुरू झाल्याने उपोषण समाप्त झाले असून, आता सरकार पुढे कोणते निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



