Home Cities पारोळा एमपीएससीत यश मिळवलेल्या रोहित पाटीलचा आदर्श शिक्षक स. ध. भावसार यांच्याहस्ते गौरव

एमपीएससीत यश मिळवलेल्या रोहित पाटीलचा आदर्श शिक्षक स. ध. भावसार यांच्याहस्ते गौरव

0
42

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवून वर्ग-२ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदावर निवड झालेल्या मोंढाळे (पिंप्री) येथील रोहित हिंमत पाटील याचा राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू (स. ध.) भावसार यांनी पारोळा येथे आपल्या निवासस्थानी भावपूर्ण सत्कार केला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पारोळा तालुक्यातील मोंढाळे (पिंप्री) गावातील रहिवासी रोहित हिंमत पाटील याने अत्यल्प सुविधा, आर्थिक मर्यादा आणि विविध अडचणींवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. त्याची वर्ग-२ अधिकारी सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदावर निवड झाल्याची बातमी वृत्तपत्रातून समजल्यानंतर आदर्श शिक्षक स. ध. भावसार यांनी त्याला विशेष निमंत्रित करून त्याचा सन्मान केला.

भावसार यांनी रोहितचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि अभिनंदनपत्र देऊन गौरव केला. यावेळी त्यांनी रोहितच्या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करणारे विद्यार्थी समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना रोहित पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भावसार सरांनी दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पुढील वाटचालीत प्रेरणादायी ठरतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आदर्श शिक्षक स. ध. भावसार हे गुणवंतांचा सन्मान करण्याच्या आपल्या परंपरेमुळे विशेष परिचित आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणी व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आतापर्यंत तब्बल १०५ गुणवंतांचा सत्कार केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शहर आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत असून, समाजात गुणवंतांचा गौरव करण्याची परंपरा त्यांनी जपल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound