Home प्रशासन ‘या तीन अटी मान्य झाल्यास उपोषण मागे घेईन’; सोनम वांगचूक यांची भूमिका

‘या तीन अटी मान्य झाल्यास उपोषण मागे घेईन’; सोनम वांगचूक यांची भूमिका

0
33

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. गेल्या २२ दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या असून त्या मान्य झाल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, त्यांना पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात हलवल्यानंतरही आंदोलनाची तीव्रता कायम असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात उघडकीस आलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात अनेक आरोपींवर कारवाई झाली असली तरी प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

शनिवारी पोलिसांनी सोनम वांगचूक यांना ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यमांवर भूमिका स्पष्ट करत उपोषण मागे घेण्यासाठी तीन अटी जाहीर केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी स्वीकारावी. तसेच त्यांना आणि सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांना संसदेपर्यंत जाऊन लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची परवानगी द्यावी आणि खासदारांनी संसदेत नीट प्रकरणावर आवाज उठविण्याचे आश्वासन द्यावे. आरोग्याच्या कारणास्तव संसदेत जाता आले नाही, तर खासदार आणि संबंधित नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन या मागण्यांबाबत लेखी किंवा स्पष्ट आश्वासन द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून नीट परीक्षा पेपरफुटीचा मुद्दा संसदेत चर्चेला येणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विरोधी पक्षांनी या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली असून आंदोलनामुळे या प्रश्नाला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाची धार कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अभिजित दिपके यांनी उपोषण सुरूच ठेवल्याने आंदोलन कायम आहे. याशिवाय, वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेतानाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने देशभरातून आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून जंतरमंतर परिसरात सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. परिसरात वॉटर कॅनन, वज्र वाहने, दंगल नियंत्रण पथके आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी बॅरिकेड्स हटविणे आणि काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याच्या वृत्तामुळे आंदोलकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound