Home क्राईम पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री ; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री ; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

0
3

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील पाठीचा माथा आणि बालाजी सर्कल परिसरातील काही पानटपऱ्यांवर विविध प्रकारच्या प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. शहरातील गजबजलेल्या भागात कथितपणे हा प्रकार सुरू असून संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आरोपांमुळे शहरात गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पाठीचा माथा आणि बालाजी सर्कल हा परिसर व्यापारी, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. येथे दिवसभर विद्यार्थी, युवक, नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणी कथितपणे प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचा आरोप होत असल्याने पालकांसह सामाजिक संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीबाबत वेळोवेळी तक्रारी होत असतानाही अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित विभागाकडून अपेक्षित प्रमाणात कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे गुटखा माफियांचे मनोबल वाढत असल्याची चर्चा शहरात सुरू असून या प्रकारामागील साखळी उघड करण्याची मागणी होत आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी संबंधित विभागाने तातडीने संयुक्त तपासणी मोहीम राबवावी, संशयित पानटपऱ्यांची तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीमुळे विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशीही मागणी पुढे येत आहे. संबंधित आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास अवैध गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच नियमित तपासणी मोहीम राबवून अशा प्रकारांना कायमस्वरूपी प्रतिबंध घालावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound