फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सलग दोन दिवस धडक कारवाई करत कासवा आणि पाडळसा येथील दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कच्चे रसायन, तयार गावठी दारू आणि हातभट्टीची साधने नष्ट करण्यात आली असून, संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता यावल तालुक्यातील मौजे कासवा येथील तापी नदीपात्रात अवैध गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती फैजपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दशरथ दिलीप सपकाळे (रा. कासवा, ता. यावल) यांच्या दारूभट्टीवर छापा टाकला. या कारवाईत सुमारे ११ हजार ५०० रुपये किमतीचे ८०० लिटर गूळ, मोह व नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन, ७० लिटर तयार गावठी दारू तसेच हातभट्टीची विविध साधने जप्त करून नष्ट करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास सुरेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर दि. १७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता यावल तालुक्यातील मौजे पाडळसा येथील राजाभोये नाल्यात पोलिसांनी दुसरी कारवाई केली. येथे गणेश रविंद्र कोळी (रा. पाडळसा, ता. यावल) याच्या अवैध दारूभट्टीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे ५ हजार रुपये किमतीचे ४०० लिटर गूळ, मोह व नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन, ३५ लिटर तयार गावठी दारू तसेच हातभट्टीची साधने नष्ट करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुक्कदर इब्राहिम तडवी यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५१/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार संतोष चौधरी, सहायक फौजदार मोती पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास सोनवणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल मुक्कदर तडवी यांनी यशस्वीपणे पार पाडली. फैजपूर पोलिसांनी अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. अशा कारवायांमुळे अवैध दारू व्यवसायाला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



