रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बलवाडी परिसरातील सुकी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि खरवा वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार दिपा जेधे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग आणि निंभोरा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या धाडीत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एक जेसीबी जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलवाडी येथील सुकी नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध खरवा उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेत तहसीलदार दिपा जेधे यांनी स्वतः कारवाईचे नियोजन केले. घटनेच्या रात्री नदीपात्रात थेट जेसीबीच्या साहाय्याने खरवा काढून तो ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे वाहतूक केला जात असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यानंतर त्यांनी महसूल विभागाच्या पथकासह निंभोरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाईचे नियोजन केले. महसूल व पोलिसांच्या पथकाने थेट नदीपात्रात धाड टाकत अवैध वाहतुकीवर कारवाई केली.

या धाडीत एमएच-१९-२९६६ आणि एमएच-१९-डीव्ही-६७१८ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली खरवा भरलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यासोबत उत्खननासाठी वापरण्यात येणारी एक जेसीबी देखील जप्त करण्यात आली. जप्त केलेली वाहने महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी महसूल विभागाकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईनंतर नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाच्या प्रकारांवर प्रशासन अधिक कठोर भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



