मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने मुक्ताईनगर तालुक्यात वृक्षलागवड व संवर्धनाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात तालुक्यातील तीन गावांमध्ये एकूण १४० वृक्षांची लागवड करण्यात आली. या मोहिमेत प्रतिष्ठानच्या सुमारे ७० श्रीसदस्यांनी श्रमदान करत सक्रिय सहभाग नोंदविला.
बुधवार, १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा, काकोडा आणि मानेगाव या गावांमध्ये विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखणे, हरित क्षेत्र वाढविणे आणि भावी पिढ्यांसाठी निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मानेगाव येथील जिल्हा परिषद शाळा (मार्तंड ऋषी परिसर) येथे झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी गावाचे सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचाही सामूहिक संकल्प केला.

प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी वृक्षलागवडीसाठी श्रमदान करत पर्यावरण संरक्षणाबाबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. वृक्षारोपणासोबतच प्रत्येक लावलेल्या रोपट्याचे नियमित संगोपन करून त्याचे वृक्षात रूपांतर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. वृक्षलागवड व संवर्धनाबरोबरच रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, साक्षरता अभियान, पर्यावरण जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा जोपासली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



