Home Cities अमळनेर लोकनियुक्त नगराध्यक्ष भेटत नसल्याने खुर्चीलाच निवेदन; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

लोकनियुक्त नगराध्यक्ष भेटत नसल्याने खुर्चीलाच निवेदन; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

0
6

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार भेटत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी नगरपरिषद कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांच्या कार्यालयातील खुर्चीलाच निवेदन चिटकवून शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनातून शहरातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश (डी.पी.) पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक, महिला आणि प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क साधूनही भेट मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असून, नागरिकांना भेटण्यासाठी वेळ न देणे योग्य नसल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.

यावेळी नगरपरिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनात अमरधाम (स्मशानभूमी) येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित वाहनतळ, सुसज्ज शोकसभागृह, एलईडी दिवे, पंखे, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॉकर सुविधा, काँक्रीट पार्किंग, बोअरवेल, कायमस्वरूपी पाणीपुरवठा, वृक्षारोपण, नियमित स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, हिरवळ, आकर्षक लँडस्केपिंग तसेच धार्मिक भजने आणि शांती मंत्रासाठी साउंड सिस्टीम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यासोबतच प्रभाग क्रमांक ३ मधील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासोबत आवश्यक गटारांचे बांधकाम करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. पावसाचे व सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी श्री. अशोक बाबुलाल सोनवणे यांच्या घरापासून ते श्री. बापू सोमा भोई यांच्या घरापर्यंत तसेच श्री. दीपक रमेश भिल यांच्या घरापासून ते सौ. कलाबाई माधुकर पाटील यांच्या घरापर्यंत गटार बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी दुर्गेश (डी.पी.) पाटील यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणाचाही अवमान करण्यासाठी नसून नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्रमांक ३ मधील गटाराच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रविण (गुड्डू) संताजीराव देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी दुर्गेश रविंद्र पाटील (डी.पी.), भुषण लोहार, चेतन पवार, चेतन पाटील, कुणाल पाटील, सागर पाटील, ललित पाटील, कुशल पाटील, विवेक निकुम, अविनाश कुंभार, चिन्मय पाटील, मोहित शिंदे, सतीश पाटील, शरद पाटील, हर्षल शिंपी, मनिषा पाटील, कोमल पाटील, शोभाबाई मिस्तरी, ठगूबाई मराठे, राजश्री धनगर, भिकूबाई कोळी, ज्योती कुंभार, पार्वती मिस्तरी, ममताज रफिक, ऊषाबाई इदोरे, मंगळाबाई पाटील, कलाबाई पाटील, मीनाक्षी पाटील, बापू भोई, सागर लांडगे, जिग्नेश पाटील, विशाल धनगर, हर्षल पाटील, जयेश पाटील, मनीष पाटील, पंकज पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन अमरधामचे आधुनिकीकरण आणि प्रभाग क्रमांक ३ मधील गटारांच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound