मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने प्रसिद्ध केलेल्या जनहिताच्या वृत्ताची प्रशासनाने तातडीने दखल घेत कार्यवाही सुरू केली आहे. “उपोषणाचा इशारा” या वृत्तानंतर मुक्ताईनगर तहसील कार्यालयाने संबंधित प्रकरण गांभीर्याने घेत वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घडामोडीमुळे वृत्ताची दखल घेत प्रशासनाने त्वरित हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्जदार अतुल अरुण जावरे यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात २७ जानेवारी २०२६ रोजी संबंधित विभागाकडे अर्ज सादर केला होता. मात्र, अनेक महिने उलटूनही त्या अर्जावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भातील वृत्त लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने १३ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल घेत १४ जुलै २०२६ रोजी मुक्ताईनगर तहसीलदारांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर यांना अधिकृत पत्र पाठवले. या पत्रात अर्जदाराने केलेल्या अर्जावर आजपर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, अर्जदाराने जाहीर केलेल्या उपोषणापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी आवश्यक ती समुपदेशनात्मक व प्रशासकीय कार्यवाही करावी, तसेच त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाकडे तातडीने सादर करावा, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने उपस्थित केलेल्या जनहिताच्या प्रश्नामुळे प्रशासनाने त्वरित हालचाल केल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित वनविभाग पुढील काळात कोणती ठोस कार्यवाही करतो, अर्जदाराच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो आणि उपोषणाची वेळ टळते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या माध्यमांच्या वृत्तांची प्रशासनाकडून घेतली जाणारी दखल ही लोकशाही व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचे महत्त्व अधोरेखित करणारी बाब मानली जात आहे. या प्रकरणात प्रशासनाच्या पुढील निर्णयाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.



