Home Cities जळगाव वाहतूक कोंडीवर तोडगा शोधण्यासाठी आयुक्त दालनात महत्त्वाची बैठक; दाणा बाजार वन-वे करण्याचा...

वाहतूक कोंडीवर तोडगा शोधण्यासाठी आयुक्त दालनात महत्त्वाची बैठक; दाणा बाजार वन-वे करण्याचा प्रस्ताव

0
12

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दाणा बाजार परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात दाणा बाजार असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, महापालिका प्रशासन आणि SDPO यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत वाहतूक व्यवस्थापन, अतिक्रमण आणि रस्ते मोकळे ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत व्यापाऱ्यांनी दाणा बाजार परिसरातील मुख्य रस्ता वन-वे केल्यास सुमारे ७० ते ८० टक्के वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊ शकते, असे स्पष्ट मत मांडले. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणीही करण्यात आली. यावर महापालिका प्रशासनाने दाणा बाजार परिसराचे मोजमाप करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिवळ्या पट्ट्यांचे मार्किंग करण्यात येईल, अशी माहिती दिली. यामुळे रस्त्याची निश्चित सीमा ठरवून वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यास मदत होईल, असे प्रशासनाने सांगितले. बैठकीत प्रशासनाने स्पष्ट केले की, दाणा बाजारमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिका व वाहतूक पोलीस संयुक्तपणे ती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी माल उतरविल्यानंतर संबंधित वाहने तात्काळ तेथून हलविण्याच्या सूचनाही वाहनचालकांना देण्यात आल्या.

यावेळी दाणा बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने तोडगा काढण्यासाठी असोसिएशन प्रशासनाला सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण असोसिएशनच्या माध्यमातून स्वतः हटविण्याची तयारीही दर्शविण्यात आली.

प्रशासनाने व्यापाऱ्यांना वाहतुकीची शिस्त पाळण्याचे आवाहन करत, दाणा बाजार परिसरात अनधिकृत अतिक्रमणासह फळ विक्रेते आणि रिक्षांच्या अनियंत्रित उभ्या राहण्यावरही निर्बंध घालण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांची गैरसोय टाळत वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. बैठकीत आयुक्त आदित्य जीवने, एसडीपीओ नितीन गणापुरे उपायुक्त पंकज गोसावी, दाणा बाजार अशोसीएसनचे अध्यक्ष अशोक धूत , वाहतूक पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम आदी उपस्थित होते.

दरम्यान, बैठकीनंतर नगररचना विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांनी दाणा बाजार येथे जाऊन संयुक्तपणे पाहणी करण्यात आली. यावेळी व्यावसायिकांना शेड काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच त्यांनी केलेले अतिक्रमण दोन ते तीन दिवसांत काढून घेण्याबाबत सूचना करण्यात आली.


Protected Content

Play sound