Home Cities जळगाव OBC नागरिकांसाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

OBC नागरिकांसाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

0
19

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इतर मागासवर्गीय (OBC) समाजातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जळगाव जिल्हा कार्यालयामार्फत विविध कर्ज, व्याज परतावा आणि कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेली सर्व उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करण्याचा महामंडळाचा मानस असून, पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपकंपन्यांच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळ, जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभ पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ यांचा समावेश आहे.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मुंबई येथील मुख्यालयाकडून जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक आणि आर्थिक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवून सर्व उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा कार्यालयामार्फत सध्या सात प्रमुख योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये २० टक्के बीज भांडवल योजना, एक लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना, बँकेमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, १० ते ५० लाख रुपयांपर्यंतची गट कर्ज व्याज परतावा योजना, १० ते २० लाख रुपयांपर्यंतची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आणि कौशल्य विकास योजना यांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार, व्यवसायवृद्धी, शिक्षण आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. महामंडळाच्या सर्व योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असल्याने पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ व्हावी यासाठी ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, मायादेवी शनी मंदिराजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा किंवा ०२५७-२२६१९१८ या दूरध्वनी क्रमांकावर माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Protected Content

Play sound