Home प्रशासन तहसील जनहिताच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ; १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा

जनहिताच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ; १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा

0
20

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जनहित, शेतकरी, वारकरी आणि नागरिकांशी संबंधित प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मुक्ताईनगर येथील माजी विशेष कार्यकारी अधिकारी अतुल अरुण जावरे यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी मुक्ताईनगरच्या तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

तहसीलदार गिरीश वखारे, मुक्ताईनगर यांना दिलेल्या निवेदनात अतुल जावरे यांनी नमूद केले आहे की, यापूर्वी २० जानेवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय आणि वन विभाग, मुक्ताईनगर यांच्याकडे जनहिताच्या विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजीही संबंधित विषयावर पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, तब्बल पाच ते सहा महिने उलटूनही कोणत्याही प्रकारचा लेखी प्रतिसाद अथवा कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवेदनानुसार, संबंधित विषय हा केवळ वैयक्तिक नसून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, वारकरी आणि भाविकांच्या हिताशी निगडित आहे. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत तहसील कार्यालय आणि वन विभागाला पूर्वसूचना देण्यात आली असून, यापूर्वीच्या निवेदनांच्या प्रतीही प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत. अतुल अरुण जावरे यांनी प्रशासनाला जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले असून, संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही झाल्यास आंदोलनाचा फेरविचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सूचित केले आहे. दरम्यान, या निवेदनावर प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.


Protected Content

Play sound