यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्याचा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता यावल शहरातही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगाव यांच्या वतीने यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी समितीच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये यावल हे तालुक्याचे मुख्यालय असूनही शहरात आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्यात आले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे केवळ ऐतिहासिक स्मरणचिन्ह नसून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारे सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे यावल शहरातील मध्यवर्ती आणि योग्य ठिकाणी भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली.

नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत या विषयावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच आगामी मासिक सभेत यावल शहरातील प्रमुख ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय चर्चेसाठी मांडून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शिवप्रेमींच्या भावना आणि मागणीचा सन्मान राखत हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील, पंकज सुधाकर हिवराळे यांच्यासह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही स्मारक उभारणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.



