Home क्राईम जळगावात अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांचा मोठा दणका; ७९ पालकांना लाखोंचा दंड

जळगावात अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांचा मोठा दणका; ७९ पालकांना लाखोंचा दंड

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत अल्पवयीन वाहनचालक आढळल्यास केवळ मुलांवरच नव्हे, तर त्यांच्या पालकांवरही थेट कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, शुक्रवार, १० जुलै रोजी ४८ तर शनिवार, ११ जुलै रोजी तर ३१ असे एकूण ७९ पालकांवर कारवाई करून एकूण ३ लाख ९५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिसांनी तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी सुरू केली आहे.

या मोहिमेदरम्यान अल्पवयीन मुले दुचाकी किंवा इतर वाहने चालविताना आढळल्यास संबंधित वाहन जप्त करण्याबरोबरच वाहन मालक व पालकांवरही प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत २ अधिकारी आणि ८ अंमलदारांच्या पथकाने ७९ अल्पवयीन वाहनचालकांची प्रकरणे उघडकीस आणली असून संबंधित पालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  वाहतूक शाखेने संबंधित अल्पवयीन मुलांच्या पालकांना शहर वाहतूक कार्यालयात बोलावून समुपदेशनही केले आहे. यावेळी पालकांना आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत मोटार वाहन चालविण्यास परवानगी देऊ नये, अन्यथा भविष्यात आणखी कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, ही मोहीम आगामी काळातही सातत्याने सुरू राहणार आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे हे केवळ कायद्याचा भंग नसून त्यांच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे पालकांनी जबाबदारीने वागून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि मुलांनाही त्याबाबत योग्य मार्गदर्शन करावे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मणराव पेंडाम यांनी नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 


Protected Content

Play sound