जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांचे करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास आणि युवा सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी इकरा एज्युकेशन सोसायटी, जळगाव यांच्या वतीने सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी विशेष शैक्षणिक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, करिअर कोच आणि गणित मार्गदर्शक अनीस कुट्टी हे विद्यार्थी, युवक आणि शिक्षकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमांतर्गत सकाळी ९ ते ११ या वेळेत ‘युवा सक्षमीकरण, चारित्र्य निर्माण, धैर्य आणि करिअर नियोजन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. हे सत्र जळगाव येथील एच. जे. थीम महाविद्यालयातील के. के. मोतीवाला हॉलमध्ये पार पडणार असून, विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्ये, सकारात्मक दृष्टिकोन आणि नेतृत्वगुण विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० ते ४ या वेळेत मोहाडी येथील इकरा बी.एड. कॉलेजच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी करिअर काउन्सेलिंग व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. विविध करिअर संधी, अभ्यासक्रमांची निवड, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील संधी याविषयी सविस्तर माहिती या सत्रात दिली जाणार आहे.

सायंकाळी ४ ते ५ या वेळेत शिक्षकांसाठी स्वतंत्र करिअर काउन्सेलिंग व व्यावसायिक मार्गदर्शन सत्र होणार असून, अध्यापनातील आधुनिक पद्धती, विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक बाबींवर अनीस कुट्टी मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अनीस कुट्टी यांनी देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, चारित्र्य विकास आणि उत्कृष्टतेची जाणीव निर्माण करण्यासाठी कार्य केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ या मार्गदर्शन सत्रांमधून विद्यार्थी, युवक आणि शिक्षकांना मिळणार असून, त्यांच्या करिअरला नवी दिशा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इकरा एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.



