Home Cities यावल जात वैधता प्रमाणपत्राच्या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल 

जात वैधता प्रमाणपत्राच्या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल 

0
5

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळावे आणि त्यांच्या शिक्षणाचे नुकसान टळावे, या मागणीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वाचे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती अधिकृत ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, व्यावसायिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा आणि विविध शासकीय भरती प्रक्रियेदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि करिअर धोक्यात येत असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली होती.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या उत्तरात संबंधित निवेदन आवश्यक त्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पुढील पाठपुराव्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचेही सूचित करण्यात आले आहे. या प्रतिसादामुळे शासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे संकेत मिळाल्याचे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे. विद्यार्थी संघटनेने शासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये जात वैधता प्रमाणपत्र निश्चित कालमर्यादेत उपलब्ध करून देणे, प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करणे, प्रवेश प्रक्रियेदरम्यान विशेष मोहीम राबविणे, शिष्यवृत्ती, प्रवेश आणि भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची हमी देणे तसेच जिल्हास्तरीय जात पडताळणी समित्यांना आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत करत जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची शासनाने गंभीर दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी संबंधित विभागाने केवळ पत्रव्यवहारापुरते मर्यादित न राहता तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राकेश सोनार यांनी सांगितले की, राज्यातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हीच संघटनेची भूमिका असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. विद्यार्थ्यांचे शिक्षण, करिअर आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरावर लढा कायम राहणार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.


Protected Content

Play sound