


सोलापूर-वृत्तसेवा । ‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या भावनिक व्हिडिओनंतर सोलापूरातील एका खासगी रुग्णालयाशी संबंधित मेडिकलवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिल्यानंतर संबंधित मेडिकलमध्ये नियमभंग आढळून आल्याने ते सील करण्यात आले.
अरबाज शेख यांनी आपल्या वडिलांना ब्रेन हॅमरेजनंतर सोलापूर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती व्हिडिओद्वारे दिली होती. उपचारादरम्यान रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बाहेर तीच औषधे जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध असताना रुग्णालयातील मेडिकलमधून अधिक दराने औषधे विकली जात असल्याचा दावा त्यांनी व्हिडिओमध्ये केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या.
व्हिडिओमध्ये अरबाज शेख यांनी सांगितले की, वडिलांना रुग्णालयात दाखल करताना प्रथम दहा हजार रुपयांची ठेव (डिपॉझिट) भरावी लागली. त्यानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे केवळ रुग्णालयातील मेडिकलमधूनच घेण्यास सांगण्यात आले. अनेक वेळा औषधे खरेदी करावी लागली आणि त्यासाठी चाळीस हजार रुपयांहून अधिक खर्च झाला. हीच औषधे बाहेरील मेडिकलमधून जवळपास अर्ध्या किमतीत मिळाली असती, असा आरोप त्यांनी केला. या व्हिडिओनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने सोलापूर शहरातील पथकाला तपासणीचे आदेश दिले. तपासणीदरम्यान नोबल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकलमध्ये औषध विक्रीसंदर्भातील अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. थंड तापमानात साठवणे आवश्यक असलेली औषधे योग्य पद्धतीने न ठेवता खुल्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या औषधांमध्ये मुदतबाह्य औषधांचाही समावेश असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
FDA च्या अधिकाऱ्यांनी संबंधित मेडिकलला नोटीस बजावत ते सील केले. सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी या कारवाईची माहिती देताना औषध साठवणूक व विक्रीबाबतच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. या घटनेनंतर खासगी रुग्णालयांमधील औषध विक्री, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पारदर्शकता आणि औषधांच्या दरांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या तपासण्या सातत्याने व्हाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



