Home Cities जळगाव जळगाव ते पंढरपूर सायकल वारीतून पर्यावरण जनजागृतीचा अनोखा संदेश ; महापौर दीपमाला...

जळगाव ते पंढरपूर सायकल वारीतून पर्यावरण जनजागृतीचा अनोखा संदेश ; महापौर दीपमाला काळे यांचाही सहभाग

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या दर्शनासाठी जळगावहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकल वारीला उत्साहात प्रारंभ झाला. सुमारे ४८५ किलोमीटरचा तीन दिवसांचा हा प्रवास यंदा सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आला असून, विशेष म्हणजे जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर दीपमाला काळे यांनीही या सायकल वारीत सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा संकल्प केला आहे.

जळगाव ते पंढरपूर या सायकल वारीत यंदा एकूण ७५ सायकलपटू वारकरी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये आठ महिलांचाही सहभाग असून, महिला सायकलपटूंनीही मोठ्या उत्साहाने या आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक जनजागृती यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळत आहे. सायकल वारीचा मुख्य उद्देश केवळ पंढरपूर दर्शनापुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचाही आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान सायकलपटू विविध ठिकाणी पर्यावरणाबाबत जनजागृती करणार आहेत. तसेच मार्गातील परिसरात सीड बॉल टाकून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, हा संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, विठुरायाच्या दर्शनाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. सायकलचा वापर हा पर्यावरणपूरक जीवनशैलीचा उत्तम पर्याय असून, या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश दिला जाऊ शकतो. तसेच जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विठुरायाच्या चरणी साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या सायकल वारीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. सायकलपटूंच्या सुरक्षित आणि यशस्वी प्रवासासाठी नागरिकांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.


Protected Content

Play sound