Home Cities पाचोरा आदिवासींच्या हक्काच्या घरकुलासाठी तहसील कार्यालयासमोर एकलव्य संघटनेचे ‘बिऱ्हाड आंदोलन’

आदिवासींच्या हक्काच्या घरकुलासाठी तहसील कार्यालयासमोर एकलव्य संघटनेचे ‘बिऱ्हाड आंदोलन’

0
19


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसास येथील आदिवासी बांधवांना हक्काच्या घरकुलासाठी जागा मिळावी तसेच दफनभूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या प्रलंबित मागण्यांसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने आजपासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर धडक बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ६ जुलै रोजी सकाळी ठीक ११:३० वाजेच्या सुमारास हे आंदोलन सुरू झाले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आदिवासी बांधवांनी व्यक्त केला आहे.

पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील आदिवासी समाज गेल्या अनेक वर्षांपासून हक्काचे घरकुल आणि दफनभूमीच्या जागेसाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अखेर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आदिवासी बांधवांनी कुटुंबासह थेट तहसील कार्यालयाच्या प्रांगणातच ठिय्या मांडला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या लहान मुलाबाळांसह आणि साहित्यासह आदिवासी बांधव या बिऱ्हाड आंदोलनात सामील झाल्याने प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ, जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे आणि तालुकाध्यक्ष गणेश वाघ करत आहेत. आंदोलनात म्हसास गावातील मोठ्या संख्येने वंचित आदिवासी महिला आणि पुरुष आपल्या हक्कांसाठी घोषणाबाजी करत सहभागी झाले आहेत. शासनाने आदिवासींच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी नेत्यांनी केला. न्याय मिळेपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

दरम्यान, आदिवासी समाजाच्या या न्याय्य लढ्याला स्थानिक पातळीवरूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख, अरमान फाउंडेशनचे अध्यक्ष फईम शेख आणि खंडू सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन एकलव्य संघटनेच्या या बिऱ्हाड आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपस्थित नेत्यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound