Home प्रशासन मुक्ताईनगरात मतदान नोंदणी अधिकाऱ्यांची पाहणी 

मुक्ताईनगरात मतदान नोंदणी अधिकाऱ्यांची पाहणी 

0
3


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक आणि निवडणूक यंत्रणेशी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि पडताळणीची कामे अचूक, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

विशेष पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी विजयकुमार ढगे यांनी मुक्ताईनगर उर्दू शाळा क्रमांक २, पिंप्रीपंचम, कर्की, पिंप्रीनांदू आणि अंतुर्ली या भागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून विशेष पुनरीक्षण मोहिमेबाबत माहिती जाणून घेतली तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. यानंतर आयोजित बैठकीत BLO, पर्यवेक्षक आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला. यावेळी श्री. ढगे यांनी प्रलंबित कामांची समीक्षा करत पात्र नागरिकांची शंभर टक्के मतदार नोंदणी सुनिश्चित करण्यावर भर दिला. प्रत्येक अर्जाची काटेकोर पडताळणी करून कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मतदार नोंदणीची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जनजागृती वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने कार्य करत मोहिमेला अधिक गती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या पाहणी आणि बैठकीदरम्यान तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश वखारे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, गटशिक्षणाधिकारी वसंत मोरे, पर्यवेक्षक संजय ठोसर, सुनील अढागळे, इरफान तडवी, विजय चौधरी, मास्टर ट्रेनर अतुल लोढे तसेच डाटा ऑपरेटर विक्रम वानखेडे उपस्थित होते.


Protected Content

Play sound