Home प्रशासन मतदार यादी शंभर टक्के अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज; न्हावी येथे SIR-2026 मोहिमेला...

मतदार यादी शंभर टक्के अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज; न्हावी येथे SIR-2026 मोहिमेला प्रारंभ

0
12


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – 2026 मोहिमेला यावल तालुक्यात वेग आला आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने मौजे न्हावी (प्र. यावल) येथे महत्त्वपूर्ण आढावा व नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी मतदान प्रक्रियेत कोणताही पात्र नागरिक वंचित राहू नये, तसेच चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सक्रिय केली आहे.

या बैठकीत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ (BLO), बीएलओ सहाय्यक, बीएलओ पर्यवेक्षक तसेच बीएलए यांना SIR-2026 मोहिमेच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष घराघरांत जाऊन मतदारांची पडताळणी करणे, EF फॉर्म भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे आणि संपूर्ण माहितीचे डिजिटायझेशन करण्याच्या कामाला यावेळी सुरुवात करण्यात आली. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव समाविष्ट करणे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे, चुकीची माहिती दुरुस्त करणे आणि मतदार यादी अधिक विश्वासार्ह बनविणे हा या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी प्रशासनाकडून गावागावांत जनजागृती आणि प्रत्यक्ष पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे.

बैठकीत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सर्व BLO व सहाय्यकांना नियोजित वेळेत घरभेटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक कुटुंबाची माहिती अचूकपणे नोंदवावी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून EF फॉर्म भरून घ्यावेत तसेच प्राप्त माहिती वेळेत ऑनलाइन प्रणालीमध्ये अपलोड करावी, असे निर्देश देण्यात आले.

यावेळी मतदार नोंदणी अधिकारी रावेर विधानसभा मतदारसंघाचे श्री. बबन काकडे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती मोहनमाला नाझीरकर, सर्व BLO, BLO सहाय्यक, BLA, मंडळ अधिकारी फैजपूर, ग्राम महसूल अधिकारी न्हावी (प्र. यावल) तसेच श्री. उमेश बेंडाळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – 2026 मोहिमेचे वेळापत्रक प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार २० जून ते २९ जून २०२६ या कालावधीत BLO प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करण्यात आली. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान घराघरांत जाऊन प्रत्यक्ष मतदार पडताळणी, छायाचित्र पडताळणी, EF फॉर्म भरणे आणि माहितीचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती किंवा वगळण्याबाबत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी करून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, BLO घरभेटीस आल्यानंतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास वेळेत दुरुस्ती करून घ्यावी. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound