


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील एका तरुण व्यापाऱ्याने मका खरेदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांचे तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंतचे पैसे थकवून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे मिळतील या आशेने विश्वासाने मका विक्री करणाऱ्या दहिगाव व सावखेडा सिम परिसरातील ३५ ते ४० शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याविरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती, तहसीलदार तसेच यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील पिंजारी कुटुंबातील एका तरुण व्यापाऱ्याने मागील वर्षापासून मका खरेदीचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात त्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेत वेळेवर पैसे देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी त्याच्याकडे मका विक्रीसाठी जाऊ लागले. मात्र काही काळानंतर त्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवण्यास सुरुवात केली. यावर्षी देखील सुरुवातीला काही शेतकऱ्यांना रोख रक्कम देऊन व्यापाऱ्याने पुन्हा विश्वास संपादन केला. शासकीय दरापेक्षा अधिक भाव देण्याचे आमिष दाखवत त्याने मोठ्या प्रमाणावर मका खरेदी केली. त्यामुळे अधिक पैसे मिळतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्याच्याकडे मका विक्री केली. मात्र त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पेमेंट थकीत राहिले. काही शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपासून तर काहींना १५ ते २० लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणे बाकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. “आज-उद्या पैसे देतो, काही दिवसांत व्यवहार पूर्ण करतो” असे सांगत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवले. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो संपर्काबाहेर असून पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी मोठे संकट ओढवले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या फसवणुकीचा फटका बसत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, माजी सभापती नारायण बापू चौधरी, माजी सभापती राकेश फेगडे आणि हर्षल गोविंदा पाटील यांच्या उपस्थितीत आपली व्यथा मांडली. यावेळी बाजार समिती प्रशासनाकडून संबंधित प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे संकेत देण्यात आले.
याशिवाय शेतकऱ्यांनी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांची भेट घेऊन व्यापाऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीवर योगेश भागवत महाजन, ललित रमेश पाटील, देवेंद्र महाजन, भूषण राजेंद्र गीते, नंदकिशोर अहिरराव, योगेश प्रेमचंद महाजन, सुधाकर पाटील आणि अजय अडकमोल यांच्यासह सावखेडा सिम व दहिगाव येथील ३५ ते ४० शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यावल परिसरात यापूर्वीही कांदा तसेच इतर कृषी माल खरेदी व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांच्या पैशांची वसुली करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



